Skip to main content

अन्वितचं बोरन्हाण..,….

काल तपसमधे एक एकदम आगळावेगळा आणि सुंदर कार्यक्रम झाला. चि.अन्वित धोपेश्वरकर ह्या बाळाचं बोरन्हाण ………. वेगवेगळे कार्यक्रम करणं तपसला नविन नाही, पण बाळाचं बोरन्हाण आणि एल्र्डर केअर सेंटर मधे, म्हणजे आपण कल्पना पण करून शकत नाही ना ? पण धोपेश्वरकर कुटुंबियांची ही इच्छा होती की त्यांच्या बाळाला सर्व आजी आजोबांचे भरपूर आशिर्वाद लाभावे आणि तपसनें हा कार्यक्रम करून ही त्यांची इच्छा पूर्ण केली.

बोर न्हाण म्हणजे वेगवगळे खाद्यपदार्थ,जसे की, कुरमुरे, तिळाचे लाडू आणि वड्या, हलवा, छोटी बोरं, हरभरे, चॉकलेट्स, छोटी बिस्किटे इत्यादि मुलांचे आवडीचे पदार्थ एकत्र करायचे आणि त्या पदार्थांनी मुलाला अक्षरशः न्हाऊ घालायचं. यामधे वापरण्यात येणारी फळंं किंवा इतर खाऊ मुलांनी आवडीचे खावा हा त्यामागचा हेतू…….छोट्या बाळाला छान कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून मधे बसवतात आणि त्याला ह्याची आंघोळ घालतात. हे सर्व पदार्थ उपस्थित असलेली इतर मुले आवडीने खातात. संक्रांती निमित घरातल्या छोट्या बाळांचही कौतुक करायची ही छान पद्धत आहे.

त्या निमित्ताने अन्वितच्या घरची जेष्ठ मंडळीही हा कौतुक सोहळा बघायला तपसमधे आली होती, त्यामुळे कार्यक्रमाला एखाद्या समारंभाचे स्वरुप आलं होतं. ………….अन्वितच्या आजीने सर्वांची ओळख करून दिली आणि हा कार्यक्रम इथे करण्यामागचा हेतू सांगितला. अन्वितला छान नटवून आणि हलव्याचे दागिने घालून मधे बसवला. तो पण अगदी गुणी बाळाप्रमाणे कांहीही तक्रार न करतां सर्व करून घेत ह़ोता. एवढंच नव्हे तर आपल्या बालसुलभ अविष्कारानीं त्यात आणखी रंग भरत होता. खरोखरंच सर्वांनाच त्यांच्या ह्या समजूतदार पणाचं खूपच कौतुक वाटलं. त्याचं वाकून सर्वांच्या पाया पडणं असो किंवा कोणत्याही आजी आजोबांनी प्रेमाने जवळ घेतल्यानंतर त्यांच्याकडे जाणं असो, फारच कौतुकास्पद आणि लोभसवाणं होतं. घरच्या मंडळींनी त्यांच्यावर केलेले संस्कार अगदी प्रामुख्याने दिसत होते. खरोखरंच अभिमानास्पद ! सर्व आजी आजोबांनी अतिशय प्रेमाने त्याला न्हाऊ घातले आणि भरपूर आशिर्वादही दिले. सगळ्यांनाच खूप आनंद वाटला……..

ह्या मुख्य समारंभानंतर रिवाजाप्रमाणे सगळ्यांनाच तिळगुळ व उपहार देण्यात आला .भेटवस्तू ही देण्यात आल्या. …………धोपेश्वर कुटुंबीयांनी अगदी वाखाणण्याजोग्या पद्धतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकमेकांविषयीचं प्रेम, आपुलकी, त्यांच्या वागण्यात प्रामुख्याने दिसत होती. आजकाल कुटुंबातून हे सर्व दुर्मिळच झालं आहे, आजी आजोबांनां मान देणं, त्यांनां वाकून नमस्कार करणं हे सर्व संस्कार आता नष्ट होत चालले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर हे कुटुंब आदर्शच म्हणायला हवं….. ह्या कुटुंबाच्या आजी, प्रभू देसाई आजी, ज्या तपसमधे रहातात आणि ज्यांच्या सहयोगाने हा समारंभ झाला, त्यांनां ही अभिमान वाटावा असंच हे कुटुंब आहे. अन्वित हा आजींचा पणतू असल्यामुळे, त्या निमित्ताने आजींच्या चार पिढ्यानीं एकत्र येऊन आनंदाने सण साजरा केल्याचं द्रश्य तपसमधे पहायला मिळालं. हा आनंद त्यांच्याप्रमाणेच आम्हांला सर्वांना अनुभवायला मिळाला. असेच आनंदाचे प्रसंग तपसमधे येत राहोत ……..

आनंदाचे डोही आनंद तरंगे
आनंदची अंग आनंदाचे……….

मंदाकिनी क्षेत्रमाडे
२९.१.२३

Leave a Reply