Skip to main content

पाऊस…मनामनातला…

उपड्या हाताचा पंजा दोन्ही भुवयांच्या समोर धरून आग ओकणाऱ्या सूर्याकडे पाहत आपण त्याची आतुरतेने त्याच्या येण्याची वाट पाहत असतो…
उपड्या हाताचा पंजा दोन्ही भुवयांच्या समोर धरून कामासाठी घराबाहेर पडताना आपण त्याच्या जाण्याची वाट पाहत असतो..
तो जितका हवाहवासा वाटतो तितकाच कधीकधी नकोनको करून सोडतो..

‘सोडू का ..पाऊस येईलसा वाटतोय!’ कॉलेज सुटल्यावर चालत चाललेल्या मैत्रिणीशेजारी हळूहळू बाईक नेत आपण घाबरून विचारतो. ती गूढपणे आपल्याकडे आणि नंतर वर आकाशाकडे पाहते..’ओके’ असं नकार मिळणार हे उत्तर गृहीत धरून आपण पंजा वर उचलून गियर टाकणार..तितक्यात ती बाईकला वळसा घालून फुटरेस्टवर जोर देत,पाठीची सॅक मध्ये ठेवत पाठीमागे बसते, नेहमी दोन्हीकडे पाय सोडून मागे बसणाऱ्या मित्रांची सवय असलेले आपण हा एका बाजूला आलेला भार आनंदाने पेलत छोट्या मिररमधून हळूच मागे पाहतो..तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळत असलेल्या चेहऱ्यावरचे डोळे प्रतिबिंबात आपल्याकडे पाहतात..आपण चाचपून हळूच गियर टाकतो..चौकातील लाल सिग्नलला हळूच ब्रेक दाबतो, सगळं ट्रॅफिक आपल्याकडे पाहतंय असं वाटतं.. पावसाची भुरभुर सुरू होते..छत्रीचा खटका दाबल्याचा आवाज येतो..मिररमधून गुलाबीसर छत्री आपल्या डोईवर दिसते.. बाहेरचा पाऊस भिजवणे बंद होतो..आतला भिजवायला लागतो..

रविवारच्या रात्री छान बाहेर हादडून वगैरे आपण तसेही उद्या नकोश्या वाटणाऱ्या ऑफीसला जाण्यासाठी अनुत्सुक असतो,रात्री उशिरा झोप लागते,सकाळी जाग येते, अजून पडून रहावं वाटतं, उठायचं असतंच,त्यात ती ढगाळ कुंद हवा…आणखीन उदास वाटायला लागतं..’पाचच मिनिटे’ समोर गरमागरम चहाचा कप घेऊन उभ्या असलेल्या बायकोला आपण आर्जव करतो…एरवी चिडचिड करणारी बायको आज छानसं हसते…”पाचच मिनिटे हां!” ती कपावर बशी झाकून ठेवत म्हणते..

“अहो या आता आत, भिजलात तर पुन्हा डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू होतील, आधीच शुगर, कोलेस्टेरॉल आभाळाला भिडलंय!” बाल्कनीतील आरामखुर्चीत बसून सोसायटीच्या झाडाझुडुपांना भिजवणाऱ्या पावसाकडे आनंदून पाहत बसलेल्या आजोबांना आजी म्हणतात.
“असू दे गं… तुला आठवतं.. आपण लग्नानंतर पहिल्यांदाच ‘बालगंधर्व’ला नाटक पहायला गेलो होतो, रात्रीच्या आठ वाजता नाटक सुटलं,चालत घराकडे निघालो, आणि वाटेत अचानक पाऊस कोसळायला लागला..मग ‘डेक्कन’ थिएटरच्या आडोश्याला थांबलो, तिथे गरमागरम भजी ….”
काहीसं समजून आजी गालात हसतात..
” अजून ती चव रेंगाळते आहे जिभेवर..”आजोबा दूरवर हरवल्यासारखं बघत म्हणतात.
आजी आत जायला निघतात..
“कुठे चाललीस? तू ऐकून देखील घेत नाही आजकाल माझं..”आजोबा वैतागून म्हणतात.
“आले…कांदा कापायला घेऊन येते..”आजी हसून म्हणतात.
“पण…कोलेस्टेरॉल..?”
“चालतयं एक दिवस… मन आनंदी राहील ते केलं की शरीरदेखील राहतं आनंदी!…पण आजच्या दिवस हां!
आजी आत जातात,आजोबा मनाने ‘डेक्कन’ बाहेरच्या भजीच्या गाड्यापाशी पोहोचलेले असतात…

हॅप्पी मान्सून..

 

लेखक
डॉ. अमित बिडवे
ऑर्थोपेडिक सर्जन, लेखक

Leave a Reply