Skip to main content

आली दिवाळी, मंगलदायी……..

दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात. दिवाळीच्या आठ – दहा दिवस आधीच तपसमधे दिवाळीची तयारी जोरदार सुरू झाली. सर्व आजी आजोबांना बरोबर घेऊन इथल्या उत्साही स्टाफने एक एक गोष्टी करायला सुरुवात केली. सर्व प्रथम दिवाळीत लावण्यासाठी सर्वांनी मिळून वैगवेगळ्या आकर्षक आकारांच्या मातीच्या पणत्या बनवल्या. दुसऱ्या दिवशी त्या सुकल्यावर विविध रंगानी त्यावर डिझाईन काढून त्या रंगवल्या. त्यामुळे तर त्या खूपच सुंदर दिसूं लागल्या.त्यानंतर लहान मोठे आकाशकंदील तयार केले. आजीआजोबा आणि सर्व स्टाफ कागद कापण्यापासून त्यांनां मोहक आकार देऊन त्यावर रंगीबेरंगी कागद लावण्यात अगदी रंगून गेले होते. बघता बघता कितीतरी सुंदर कंदिल बनवून झाले. त्यानंतर एक दिवस सैन्याच्या जवानांसाठी सुंदर ग्रिटींग कार्ड्स बनवली तर एक दिवस ती घालून पाठवण्यासाठी रंगीत कागदांच्या सुरेख पिशव्या बनविल्या. त्याचप्रमाणे कागदाची तोरणं बनवून त्याने सुंदर सजावट केली गेली. त्यानंतरच्या दिवशी खास कार्यक्रम होता, बेसनाचे लाडू बनवण्याचा. स्मिता ताईंनी मेहनतीने खमंग भाजून दिलेल्या बेसनाचे सर्व महिला वर्गाने मिळून पटापट सुंदर लाडू वळले. लाडवानां बघूनच दिवाळी आल्याचे जाणवू लागले.

ह्या सर्वाच्या बरोबरच तपसचे यशस्वी कलाकार किल्ला बनविण्यातही रंगले होते.बघता बघता देखणा , किल्ला बनवून झाला देखील.रंगविल्यावर तर तो फारच सुंदर दिसूं लागला. त्यावर जागोजागी बुरूज व दिंडी दरवाजे करुन, छोटे सैनिक आणि त्यांचे घोडे तिथे ठेवले होते. प्रत्येक बुरुजावर छत्रपतींचा भगवा झेंडा फडकत होता आणि किल्ल्यात वरती, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले होते. किल्यावर ठिकठिकाणी झाडे व हिरवेगार गवत लावून शोभा आणली होती. सर्वत्र दिवे लावले होते व भोवताली सुंदर रांगोळी काढली होती. लिलाधर आणि पवनने दोन तीन दिवस मेहनत करून ही अप्रतिम देखणी कलाकृती तयार केली होती. त्यांच्या मेहनतीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.अशी जय्यत तयारी करुन सर्व मंडळी दिवाळीच्या आगमनाची वाट पाहून लागली.

दिवाळीचा पहिला दिवस, ‘ वसु बरसच्या ‘ दिवशी, गाय आणि वासराची पूजा केली गेली. त्यासाठी लागणाऱ्या गाय आणि वासराच्या प्रतिकृती लिलाधरने स्वतः बनवल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या टेबलावर पूजेचं सर्व साहित्य मांडून , मध्यभागी ह्या मूर्ती ठेवल्या होत्या. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की खऱ्याचं असल्याचा भास होत होता. बाजूला झुणका भाकरीचा नैवेद्यही ठेवला होता.सर्व आजी आजोबांनी वैयक्तिक रित्या त्या ” सवत्स धेनुची॔ “, मनापासून पूजा केली. त्यानंतर आजच्या तितक्याच आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिवाळी चा सर्व फराळ प्लेटस् मधे घालून टेबलावर सजवून मांड्न ठेवला होता. त्यामधे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, अनारसे, करंज्या. चकल्या, शेव, चिवडा आदि सर्व फराळाचे प्रकार होते. विशेष म्हणजे ह्यातले बरेच प्रकार तपसच्या स्टाफने म्हणजे तृप्ती ताई, स्मिताताई, करिष्मा आणि आलिशाने बनवले होते. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. सर्व मंडळींनी ह्या फराळाचा आस्वाद घेतला.

त्यानंतर एक मनोरंजनाचा कार्यक्रम झाला, तो म्हणजे कौशिकचं बेंझवादन. मुळांत आफ्रिकन आदिवासींचं हे वाद्य आतां खूप लोकप्रिय झालं आहे. कौशिकने त्यांच्यावर वेगवेगळे ताल वाजवून दाखवले. आपल्याकडचा तबला आणि हे बेंझ, ह्या मधला फरकही त्यांनीं सांगितला. लोकांनींही तो वाजवत असतानाच तालात टाळ्या वाजवून त्याला उस्फूर्त दाद दिली. कांहीनीं प्रश्न विचारुन अधिक माहितीही विचारली. त्यानंतर दिवेकर आजोबांनीं दिवाळीच्या निमित्ताने केलेली एक सुंदर स्वरचित कविता सादर केली. सर्व उपस्थितांनीं एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता आणि तपसच्या मुला -मुलींनीही सर्व जेष्ठांना नमस्कार करून , आजी आजोबांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आज सकाळी जेवणांत शेवयांची खीर होती तर रात्री ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा खास बेत होता.

आजच्या कार्यक्रमाला तपसमधे राहून गेलेल्या कांहीं जुन्या मंडळीनां मुद्दाम बोलावलं होतं. त्यांच्या उपस्थितीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि गप्पा अधिकच रंगल्या. जातांना त्या सर्वांनां एक छोटिशी भेटही देण्यात आली. ह्या सर्व गोष्टींमधे वेळ खूपच मजेत गेला. तपसच्या टीमच्या ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमा बद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार !

दुसऱ्या दिवशी, म्हणजे “धनत्रयोदशीच्या ” दिवशी अशीच सुंदर पूजा लक्ष्मीची करण्यात आली. अत्यंत कलात्मक तर्हेने धनाची सजावट करण्यात आली होती. त्याच्या भोवती छोट्या मातीच्या रंगीत सुगडांत वेगवेगळे धान्य भरून ठेवले होते. ही सर्व सुगडे तपसच्या मुलांनीच सुंदर रंगवली होती. नैवेद्य म्हणून सुंठवडा ठेवला होता. सर्वांनां अल्पोपहार देण्यात आला. टेबलाभोवती रोज नवीन छान रांगोळी काढली जात होती. आज काही जणांनीं कविता वाचन केलं, तसंच आजच्या दिवसाचं महत्वही सांगितलं.

दिवाळीच्या दिवशी, म्हणजे , ” नरकचतुर्दशीच्या” दिवशी सगळीकडे कंदिल व दिव्यांची व फुलांची तोरणं लावल्यामुळे तपसचा परिसर फारच झळाळून उठला होता. मुख्य दरवाजाच्या जवळ संस्कार भारतीची मोठी आकर्षक रांगोळी काढली होती. त्यामुळे वातावरण पवित्र झालं होतं. त्याच दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने दुपारी देवी लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने छोट्या केरसुणीलाही त्यादिवशी द्यायचा मान देऊन तिची पूजा करण्यात आली. वेगवेगळी नाणी व नोटा छान रचून व सजवून पूजेत ठेवली होती पूजेचं सर्व साहित्य, फुलं, फळं, देवीचे सौभाग्यलंकार, पंचारती इ. सर्व गोष्टी टेबलावर रचून ठेवल्या होत्या. लक्ष्मीच्या पूजेनंतर एक मंगलमय वातावरण तयार झालं. प्राजक्ता आणि तुषार सरांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. त्या दोघानीं सर्वांनां नमस्कार करुन , आजी आजोबांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तपसच्या मुला -मुलींनीही सर्व जेष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठी संध्याकाळी शोभेचे फटाके लावण्यात आले. ह्यात सर्व आजी आजोबांना ही सहभागी करून घेण्यात आले. आज जेवणांत श्रीखंड पुरीचा खास बेत होता.

” भाऊबीज,” दिवाळीचा शेवटचा दिवसही, उत्साहात साजरा झाला. आजी आजोबांचा भावनापूर्ण भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला. आपल्या माणसांपासून दूर असुनही भाऊबीज केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अतिशय आनंदाच्या अशा दिवाळीचा सणाची अशाप्रकारे गोड सांगता करण्यात आली.

हे सर्व दिवस सगळ्यांनी मिळून आनंदात घालवले. स्वत:घ्या घरीच सण साजरा केल्यासारखा वाटला. आकर्षक रोषणाई व सजावट, रांगोळ्या आणि कंदिल, वेगवेगळ्या पारंपारिक पूजा, पक्वान्नांचं जेवण, फराळाचा आस्वाद, सर्व काही घरी असल्यासारखं होतं. आजी आजोबांना प्रत्येक पूजेत प्रत्यक्ष सहभागी व्हायला लावलं होतं . सर्वच कार्यक्रमात त्यांनां भाग घ्यायला लावल्यामुळे त्यांचाही उत्साह व आनंद वाढत होता. तपसच्या सर्व सहकाऱ्यानी ह्यासाठी खूपच श्रम घेतले, मेहनत केली. त्या सर्वांचे आणि प्राजक्ताचे खूप खूप आभार. दिवाळीचा सण इतक्या मंगलमय वातावरणात साजरा केल्यामुळे मनाला प्रसन्न वाटलं, त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन आणि शुभेच्छा ! दिवाळी आली आणि पटकन् संपली देखील, तरीही हा आनंद आम्हां सर्वांच्या मनात पुढचे अनेक दिवस राहिल ह्यांत शंकाच नाही.
शुभ दीपावली !

मंदाकिनी क्षेत्रमाडे
२९.१.२३

Leave a Reply