वृद्धाश्रम म्हणा किंवा oldage home , या शब्दांकडे काही वर्षांपूर्वी…. किंवा अगदी आजही, अगदी वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यामध्ये एक परकेपणा भरलेला असतो. एखाद्या घरातील कुणा ज्येष्ठांला वृद्धाश्रमात ठेवलं, की त्यातून साधा सोपा सरळ अर्थ काढला जायचा किंवा जातो,
“मुलांना जड झाले आता आई बाप, टाकलं (ठेवलं सुद्धा नाही) त्यांना नेऊन वृद्धाश्रमात. विसरले, कसं तळहाताच्या फोडासारखं जपलं आजवर ते.”
अर्थात चित्रपटांनीही ही समजूत दृढ करण्यात मोलाचा हातभार लावला म्हणा. परंतु आज मात्र वृद्धाश्रम ही काळाची, समाजाची, कुटुंबाची गरज आहे.
माझा एक मावसभाऊ म्हणतो,
“अरे, कशाला राहायचं आपल्या मुलांवर अवलंबून. एखाद्या छानशा वृद्धाश्रमात जाऊन राहायचं. समवयीन लोकांबरोबर छान संवाद साधायचा, भरपूर वाचन करायचं, मुलं नातवंडं भेटायला आली की त्यांच्याशी मस्त गप्पा मारायच्या आणि हसत त्यांना निरोप द्यायचा. सकारात्मक विचारामधून मिळणारी ऊर्जा आपलंच आयुष्य सुंदर करून जाते, असो,
तोंड उघडताना आपण लक्षात घ्यायला हवं की अगदी कुणीही, उचललं घरातल्या म्हाताऱ्याला आणि टाकलं नेऊन वृद्धाश्रमात असं होत नसतं….. म्हणजे अपवाद असू शकतात, परंतु सरसकट असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या आई किंवा वडीलाना वृद्धाश्रमात ठेवताना त्यांच्या मुलांना यातना होतातच, परंतु अनेकदा नाईलाज असतो, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. यामध्ये अनेक गोष्टी असतात, स्मृतिभ्रंश किंवा शारीरिक व्याधींनी त्रस्त झालेल्या घरातील ज्येष्ठांच्या सतत बदलणाऱ्या मनस्थितीला, आपण परावलंबी झालोय, ही त्यांच्या मनातली भावना सांभाळून त्यांची काळजी घ्यायला सज्ज रहाणं मनात असूनही शक्य होत नाही, याची बोच अस्वस्थ करते. त्यांना पुरेसा वेळ देणं आजच्या वेगवान आयुष्यात आणि कॉर्पोरेट जगात वावरत असल्याने कठीण होऊन बसतं. अनेक घरात वृद्धांची मुलं सुद्धा साठीकडे आलेली असतात. बरं त्यांची आबाळ होऊ नये असं अगदी आतून वाटत असतं. अशा या त्रिशंकू अवस्थेत अखेर वृद्धाश्रम किंवा day care centre हा पर्याय उभा रहातो. मी असं विधान अजिबात करणार नाही की सगळेच वृद्धाश्रम अत्यंत सेवा भावाने चालवले जातात, किंवा वृद्धांची संपूर्ण काळजी तिथे घेतली जाते. उलट अनेक वृद्धाश्रमात ज्येष्ठांसाठीच्या पायाभूत सुविधांचाही विचार केलेला नसतो. मी स्वतः काही वृद्धाश्रमात गेलो होतो, तिथे जुनं सामान dump केल्यासारखं जास्तीत जास्त लोखंडी
खाटा लावून वृद्धांची भरती केलेली होती. खाटेवर बसून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. चार पावलं शतपावली करायलाही जागा नाही. चादरी उशांचे अभ्रे अत्यंत अस्वच्छ स्थितीत होते. सारीकडे स्वच्छतेचा अभाव आणि वातावरणात मरगळ दाटलेली.
अर्थात असेही काही वृद्धाश्रम निश्चितच आहेत, जिथे ज्येष्ठांची चांगली, मनापासून आणि सेवाभावाने काळजी घेतली जाते. आणि अशा वृद्धाश्रमांमध्ये पुण्यातील औंध आणि बालेवाडी इथल्या “तपस” वृद्धाश्रमाचं” नाव आवर्जून घ्यावं लागेल. इथे मेंदू आणि शारीरिक व्याधींशी झगडणाऱ्या आजी आजोबांसाठी आणि मघा मी म्हटल्याप्रमाणे आपली तब्येत बऱ्यापैकी सांभाळून, आणि उर्वरित आयुष्याशी दोस्ती करून जगण्याची इच्छा असलेल्या आजी आजोबांसाठी अशी दोन सेंटर्स कार्यरत आहेत. या सामाजिक उपक्रमाची संस्थापक, चालक आहे प्राजक्ता वढावकर. अगदी नुकतीच तिच्या या कार्याबद्दलची मुलाखत मी यूट्यूबवर पाहिली ऐकली आणि खरोखर मनात कौतुक दाटून आलं. तसही तपसमध्ये ज्येष्ठांसाठी चालणाऱ्या अनेक activities fb वरून पाहायला मिळत असतात म्हणा. कसलाही अनुभव पाठीशी नसताना, एका मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या मुलीने आपल्या मनातल्या वृद्धाश्रमाच्या स्वप्नाला, वास्तवात आणून दाखवणं इतकंच नव्हे तर, हृदयातला सेवाभाव जपून गेली पाच वर्ष सातत्याने, वास्तवात आलेल्या स्वप्नाला नेमका आकार देणं आणि लक्षणीय प्रगती करणं ही गोष्टच परिकथेसारखी वाटणारी आहे. समाजातील most dependant परावलंबी वर्गासाठी काही करावं या प्राजक्ताच्या मनातील भावनेतून तपसचा जन्म झाला. यूट्यूब वरील मुलाखतीदरम्यान, आपल्या कामाबद्दल बोलताना, प्राजक्ताचे एक सुंदर वाक्य उच्चारलं की,
चांगल्या विचारांनी काही केलं की निश्चितच काही सुंदर घडतं. एखादी गोष्ट आपल्याला मनापासून भावते, हे भावणं फार महत्त्वाचं असतं, ज्यामधून खूप काही चांगलं, रचनात्मक आणि मनाला आनंद देणारं ऊभं रहातं. हा विचारच इतका सुंदर आहे, की तपसच्या यशस्वीतेचं मूळ यामध्ये आहे. तपस मध्ये येणारे वृद्ध, ज्या घरात आपलं संपूर्ण आयुष्य गेलंय ते घर सोडून, एका अनोळखी ठिकाणी आलेले असतात. त्यामुळे सर्वप्रथम तपसमध्ये आलेल्या ज्येष्ठांना सुरक्षित वाटेल याची काळजी घेतली जाते. जबरदस्ती किंवा काटेकोर नियम तपसमध्ये लावले जात नाहीत, तर इथे ज्येष्ठांचे लाड पुरवले जातात, त्यांची काळजीही घेतली जाते आणि या दोन्हींमधून शिस्त आपोआप जन्माला येऊन जाते.
प्राजक्ताच्या मनातले उद्देश इतके सुंदर आणि पारदर्शक आहेत, की जे ऐकताना एक निरपेक्ष निरागस मन डोळ्यांसमोर उभं रहात होतं. बोलताना ती म्हणाली की,
मला सुरू करायचा असलेला सामाजिक उपक्रम हा, ना नफा तत्वावर असावा, त्यासाठी कोणतीही बाहेरची आर्थिक मदत घ्यायची नाही, परंतु सेवा मात्र उत्कृष्ट द्यायची, हे तिच्या ठाम मनात होतं. या उपक्रमातील नैतिकता कायम जपायची. आता हे सगळं प्राजक्ताच्या मनातलं तपस परिवाराच्या मनात कसं उतरायचं ? सेवाभाव हृदयात उमलल्याशिवाय हे होऊ शकत नाही, आणि अनेक ठिकाणी याचीच वानवा असते. ती म्हणालीही,
“मुळात हृदयातली माणुसकी जपायला हवी, बाकी सगळं ट्रेनिंग देता येतं.”
प्राजक्ता जमिनीवर पाय घट्ट ठेवून उभी असते, आणि तिच्या मनातला सेवाभाव ये हृदयीचे ते हृदयी या भूमिकेतूनच कदाचित संपूर्ण तपस परिवारात, ज्यामध्ये डॉक्टर्स, सायकॅट्रीस्ट, सोशल वर्कर्स पासून परीचारकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रस्थापित होत असावा. मुलाखतीत ती म्हणाली ते मलाही पटलं की,
“Interview घेताना समोर बसलेल्या व्यक्तीच्या हृदयातली माणुसकी, समाज कार्याची कळकळ मला जाणवते, आणि माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेतल्यासारखे तपसमधल्या आजी आजोबांना सांभाळतात, याचा अर्थ स्वतः प्राजक्ता या उपक्रमात तन मनाने, किती बुडून गेलेली आहे हे लक्षात येतं. तपसमधील निवासी ज्येष्ठांसाठी अनेक लहान उपक्रम त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, आनंद मिळावा, जे आपण कधीही केलं नव्हतं ते करू शकलो हे समाधान मिळावं यासाठी केले जातात. खाण्याचा एखादा सोपा पदार्थ बनवणे, रांगोळी काढणं ही या पिढीतील स्त्रियांची खासियत होती. आज खाली बसून हे शक्य होत नाही, मग खुर्चीवर बसून समोरच्या टेबलावर रांगोळी रेखली जाते किंवा जुन्या काळातील पॉट आइस्क्रीमची गंमत आणि लज्जत जी आजच्या पिढीला कळणार नाही. तपस परिवारासोबत आजी आजोबा याची तयारी करतात आणि पॉट आइस्क्रीमचा सगळ्यांसोबत मस्त आनंद घेतात. दिवाळीला छान कंदील माळा यांची सजावट करतात तर आषाढी एकादशीला सगळे टोपी घालून विठुरायाच्या पालखीचा सोहळा रंगवतात, गणेशोत्सव, दहीहंडी अशा सगळ्या सणांचा आनंद घेतात. यासोबत रोजचे शारीरिक व्यायाम असतातच. स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्धांना, त्यांच्या आवडीच्या गोष्टीत रमवणं, किंवा त्यांचे मूड्स सांभाळून त्यांच्या कलाने घेणं या सगळ्यामुळे त्यांना द्याव्या लागणाऱ्या न्युरो सायकॅट्रीक औषधांच्या डोसचं प्रमाण कमी होतं हे मुलाखतीमध्ये प्राजक्ताचे अभिमानाने सांगितलं.
तपस सारखे सेवाव्रती आज निर्माण होण्याची गरज आहे, ज्यामधून ज्येष्ठांना आधार – लाड आणि काळजी या तीनही गोष्टी मिळतील. वृद्धांचा वियोग यांत्रिक होऊ नयेच पण फार भावनाशीलही होऊ नये एवढी काळजी घेतली जाते. कारण गुंतून पडलं की पुढचा प्रवास कठीण होऊन बसतो. दुःख साचून न रहाता त्याचा निचरा झाला की खूप हलकं वाटतं. सत्य स्वीकारण्याची सवय झाली की सगळंच सोपं होऊन जातं. स्मृतिभ्रंश याकडे सकारात्मकतेने कसं पहाता येईल या प्रश्नाचं फार छान उत्तर प्राजक्ताने दिलं,
विसरलेल्या वर्तमानाचं दुःख न करता मेंदूमध्ये घट्ट बसलेल्या भूतकाळाच्या स्मृतींमध्ये रमून जाणं आणि तो आनंद भरभरून घेणं.
अखेर सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे,कोणतंही काम करताना किंवा करायला घेताना ते भावणं गरजेचं असतं. जे काम, जी गोष्ट किंवा जे नातं मनापासुन भावतं त्यामधून खूप काही चांगलं, छान, सुंदर उभं रहातं हेच खरं.
तपस या सामाजिक उपक्रमाच्या मागे संपूर्ण शक्तिनिशी आपल्या टीमसहित उभ्या असलेल्या प्राजक्ताचा चेहरा, तिचं बोलणं, तिचे पुढचे आराखडे, ज्यामध्ये या ज्येष्ठांच्या कुटुंबीयांसाठी काही करावं, वयाच्या पंच्याहत्तरीनंतर झेपेल असं समाजोपयोगी काम देता येईल का याचा विचार, तरुणांमध्ये या कामाविषयी जागृती करणं हे पहात ऐकत असताना, एका संवेदनशील परंतु ठाम आणि एकेकाळच्या मनातल्या परिकथेसारख्या वाटणाऱ्या वृद्धाश्रमाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणाऱ्या तरीही कायम जमिनीवर चालणाऱ्या, मनातलं शैशव क्वचित खळखळून हास्यातून जपणाऱ्या एका विदूषीला पाहिल्याचं ऐकल्याचं समाधान ही मुलाखत पहाताना मिळालं. ज्युदोची उत्कृष्ट खेळाडू असलेली प्राजक्ता म्हणते की, या खेळामुळे काय मिळालं, तर defensive mode ठेवून आणि शांतपणे समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन निर्णय घ्यायचा. आपलं काम अजून मोठं व्हावं ही तिची मनापासून इच्छा आहे, परंतु त्यासाठी कसलीही तडजोड करून ते मोठं व्हावं किंवा महत्वाकांक्षेपोटी मोठं व्हावं असं अजिबात वाटत नाही हा तिचा मुद्दा तीच्यामधलं खरेपण सांगून गेला.
फार पूर्वी प्राजक्ताने लहान मुलांसाठी केलेल्या कामाचा उपयोग, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, हे समजून घ्यायला तिला पुरेपूर झाला असावा बहुधा……..
तपस जिथे ,
आस्था, जपणूक, निगा –
हातात हात घालून असते.
तपस जिथे,
प्रेम, आपलेपण,संस्कार –
प्राजक्ताच्या सड्यावर –
नांदत असते.
ज्येष्ठांना इथे मान असतो,
पाठीचा कणा त्यांचा –
ताठ असतो.
मी ही आहे कुणीतरी –
झालो वृद्ध टाकावू नाही परि –
हा सुविचार मनी –
जागलेला दिसतो.
ज्येष्ठांना देते तपस –
आधाराचा हात,
जगण्याची उमेद अलवार –
जागवते मनात.
अश्रूंना इथे प्रवेश नसतो,
कारण, तपसमध्ये फक्त –
आनंदच वसतो.
तपस म्हणजे ज्येष्ठांची –
अखेरपर्यंत साथ ,
वृद्धत्व संपतं इथे –
सारे येतात वयात.
खूप शुभेच्छा तुला आणि संपूर्ण तपस परिवाराला.
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी