तुळशीचं लग्न !
काल तपसमधे धूमधडाक्यात लग्न पार पडलं. बरोबर ओळखलंत, तुळशीचंच ! एवढ्या थाटामाटात कार्य पार पडलं कि विचारायची सोय नाही . मध्यभागी टेबल ठेवून त्याला जरीच्या वस्त्रांत गुंडाळलं होतं आणि त्यावरुन छोट्या दिव्यांची माळ लावली होती. त्याच्या एका बाजूला ऊस मांडून ठेवले होते. त्याच बाजूला नवरदेव, म्हणजे छोट्या बाळकृष्णाची मूर्ती, सजवून चौरंगावर ठेवली होती. त्याला छान जरीचा अंगरखा घातला होता आणि डोक्यावर सुंदर मुकुट घातला होता. गळ्यात मोत्यांची माळ घातली आणि त्यावर फुलांचा छोटा हार घातल्यावर तर तो खूपच गोड दिसूं लागला.
नवरीच्या थाटही कांहीं कमी नव्हता. तुळशीच्या कुंडीला जरीचा घागरा आणि चोळी नेसविली होती. गळ्यात छान लफ्फा आणि कानात मोठे झुमकेही घातले होते. गळ्यात फुलांचा हार घातल्यावर तर नटलेली नवरी खूपच सुंदर दिसत होती. तिला बघून तर ” नवरी नटली, अगबाई सुपारी फुटली ! ” हे गाणं म्हणायचा मोह आवरत नव्हता.
लग्नाची तयारी पण अगदी साग्रसंगीत केली होती. आरतीचे तबक, फुलांचं ताट ह्याच्या बरोबरच ह्या लग्नांत लागणारी नवरीच्या ओटीची तयारी पण व्यवस्थित केली होती. त्यामधे प्रामुख्याने दिसत होता, हिरवा खण आणि सुपारी, छोटासा आरसा व फणी, कुंकवाची डबी इत्यादी सर्व काही. बाजूला मंगल कलश ठेवला होता. जवळच एका ताटात पांच प्रकारचे छोटे लाडू आणि लग्न लागल्यावर वाटण्यासाठी पेढे ठेवले होते. ह्या लग्नांत महत्व असलेले आवळे, चिंचा, बोरं हे सुद्धां न विसरतां आणले होते. संपूर्ण टेबल फुलांनी सजवलं होतं आणि शिवाय त्याच्याभोवती मोठी छान रांगोळीही काढली होती. कुठल्याही कार्यक्रमांत न विसरता सर्व तयारी करणं हे तर तपसच्या मुलांचं वैशिष्ट्य आहे. लिलाधर, पवन, आलिशा, करिष्मा व इतरांनी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत होती. त्यांच्या ह्या कामाला, ते ही हौस म्हणून केलेलं, जबरदस्तीने नव्हे, दाद द्यायलाच हवी.
प्रत्यक्ष लग्न लागताना उडालेली लगीनघाई तर मजेशीरच होती. सर्व आज्या खास जरीच्या साड्या नेसून लग्नाला आल्या होत्या. विशेष म्हणजे, नवरा आणि नवरी, दोन्ही पक्षाची मंडळी समजूतदार असल्याने रुसवे फुगवे न होतां कार्य पार पडत होतं. वराच्या बाजूने लिलाधर आणि वधूच्या बाजूने पवन मानकरी होते. ते दोघं बरेच रोल्स करीत होते, जसे की, वरपिता व वधूपिता, लग्न लावणारे भटजी, लागणाऱ्या सर्व वस्तू पुरवणारे आणि लग्नाला आलेले पाहुणे इत्यादी.
सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. मंगलाष्टकानां सुरुवात झाली. सर्व मंडळी खरोखरचं लग्न लागत असल्याचा आनंद घेत होती. आणि ” शुभ मंगल सावधान ” चे शब्द कानावर पडले, अंतर्पाट दूर झाला आणि वधूवरांना हार घातले गेले .जमलेल्या मंडळींनी थाळ्या आणि चमचे व ढोलकं वाजवून एकच जल्लोष केला. नवरीच्या गळ्यांत मंगळसूत्र घातलं . एकंदर कार्य आनंदात व उत्साहात पार पडलं. सर्व जणांनी श्री कृष्णाला आणि तुळशीला ओवाळलं आणि फुलं वाहिली. सर्वांना फराळ आणि पेढे असा अल्पोपहार देण्यात आला. वधू वरां सोबत सर्वांनी फ़ोटो काढून घेतले. फॅमिली फोटोही झाला. राजे आजीनीं आणलेली तुळशी विवाहाची माहिती प्रभू देसाई आजीनीं वाचून दाखवली. त्यानंतर शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी झाली. अशा आनंदी वातावरणात समारंभाची सांगता झाली.
दोन तास आम्हांला एक वेगळाच आनंद दिल्याबद्दल तपसच्या कार्यकर्त्यांनां धन्यवाद. तुळशी विवाह हा आजकाल विसरत चाललेला सणही आवर्जून करणे आणि तोही एवढा साग्रसंगीत, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. असे प्रसंग साजरे करून, सर्व आजी आजोबांना ही त्यात उत्साहाने भाग घ्यायला लावून आनंदाचे कांहीं क्षण त्यांनां द्यायचे , ही तपसच्या टीमची खासियतच आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. ह्या कार्यक्रमा मागची प्रेरणा आणि शक्ती ही अर्थातच प्राजक्ता आहे त्यामुळे तिलाही धन्यवाद. थॅंक यू तपस !
( ह्या कार्यक्रमाची कांही क्षणचित्रे सोबत जोडत आहे. ती बघून आपल्याला तो आनंद पुन्हा घेतां येईल अशी आशा करते. )
मंदाकिनी क्षेत्रमाडे
६.११.२०२२