Skip to main content

कालाय तस्मै नमः 🙏

ज्या प्रमाणे काळ कोणासाठी थांबत नाही त्याचप्रमाणे वय सुद्धा कोणासाठी थांबत नाही. बालपणातून तारुण्य, तारुण्यातून प्रौढत्व व प्रौढत्वातून वृद्धत्व हा निसर्गाचा नियम आहे व आपणा सर्वांनाच कधीतरी वृद्धत्व हे येणारच आहे. आयुष्यभर कष्ट केल्यावर या वयात थकलेल्या शरीराला व मनाला एका भक्कम आधाराची गरज असते. काळानुसार सर्वच गोष्टीत बदल होत असतात, जीवनमान धकाधकीचे होत असते व दोन पिढ्यातील अंतरही वाढत असते. पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती ओघानेच नष्ट होत आहे व त्यात चूक कोणाचीच नसते. बदल हा शेवटी निसर्गाचा नियम आहे व हळूहळू का होईना, तो सर्वांनाच स्वीकारणे गरजेचे असते

या बदललेल्या परिस्थितीनुसार आपल्या जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी “तपस” सारख्या संस्था जन्माला येतात. पण त्यांची पाळेमुळे भक्कम असणे अत्यंत गरजेचे असते. संचालिका प्राजक्ता ताईंनी काही वर्षांपूर्वी लावलेल्या व भरभक्कम पाया असलेलल्या “तपस” नावाच्या आस्थेच्या छोट्या रोपट्याचे हळूहळू आता एका वृक्षात रूपांतर होत चालले आहे. जेष्ठ नागरिकांची देखभाल हि एक सामाजिक बांधिलकी आहे या भावनेंतून प्राजक्ता ताईंनी तपस ची स्थापना केली होती व नशिबाने त्यांना समविचारी सहकारी सुद्धा लाभले आहेत. ते म्हणतात ना “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी”

आस्था, आपुलकी, जिव्हाळा व माया या मूलभूत तत्वांना गाठीशी बांधून प्राजक्ता ताई व त्यांचे सर्व सहकारी अहोरात्र अनेक आजी आजोबांची येथे मनापासून काळजी घेत असतात. येथे रोज वेगवेगळे क्रियाकलाप केले जातात. करमणुकीचे कार्यक्रम होतात, प्रार्थना व ध्यानधारणा होते. व्यायाम करवून घेतात व विस्मृतीच्या भोवऱ्यात अडकलेल्यांसाठी स्मृतीला चालना देणारे खेळ होतात. प्रत्येक सणवार इथे घरापेक्षाही सुंदर साजरा केला जातो. प्रत्येकाचा वाढदिवस इतक्या अप्रतिम रीतीने साजरा करतात कि आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगून जातो. कधी तव्यावर डोसे काढले जातात तर कधी उन्हाळ्यात पॉटची आईस्क्रीम पार्टी होते. कधी कोजागिरीच्या चांदण्यात बसून केशयुक्त दूध पिले जाते तर कधी वाढदिवसाच्या केकचा घास प्रेमाने भरवला जातो. दिवाळीमध्ये तर धमालच असते. फटाके, आकाशकंदील, लाडू चिवडा, पूजा अर्चा यांना उधाण आलेले असते. गुढी पाडवा, होळी, तुळशीचे लग्न, संक्रांत, असे अनेक सण या कुटुंबात आनंदाने साजरे होतात. आयुष्याच्या या उंबरठ्यावर परत एकदा उत्साह व आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला जल्लोष इथे रोज साजरा होत असतो. याशिवाय दैनंदिन जीवनात वेळच्यावेळी सात्विक आहार, औषधपाणी, वैद्यकीय सेवा, डॉक्टरांच्या भेटी हे सर्व ओघाने आलेच. नातेवाईकांना न चुकता डॉक्टरांचे रिपोर्ट व सर्व क्रियाकलापांचे फोटो पाठवले जातात
तपसचे उद्दिष्टच एक आनंदी आणि सकारात्मक तसेच उत्तेजक आणि समृद्ध करणारे वातावरण राखणे हे आहे. ज्येष्ठांनी परिपूर्ण जीवन जगावे याची खात्री करण्यासाठी असाधारण वृद्धसेवा प्रदान करणे हि त्यांची मूलभूत धारणा आहे व नशिबाने प्रजक्ता ताईंना सर्व सहकारी सुद्धा समविचारी भेटल्यामुळे एका आनंदी व खेळकर वातावरणात ज्येष्ठांच्या आयुष्याला इथे कलाटणी मिळाली आहे.

माझी आई तपस मध्ये गेली दोन वर्षे निवास करून आहे. कोव्हीड नावाच्या राक्षसाने जेव्हा अक्राळविक्राळ रुप धारण केले होते तेव्हा माझ्या भारतातील नातेवाईकांनी आईबाबांना तपस मध्ये दाखल केले. सीमा बंद असल्यामुळे मी भारतात येऊ शकत नव्हतो. या अतिशय कठीण प्रसंगी प्राजक्ता ताई व त्यांच्या समस्त चमूने माझ्या आईबाबांची ज्या पद्धतीने काळजी घेतली त्याला तोड नाही. दुर्दैवाने माझ्या बाबांचे तपस मधेच निधन झाले परंतू कोव्हीडमुळे मी त्यांच्या अंत्यसंस्काराला व आईला आधार देण्यासाठीसुद्धा येऊ शकलो नाही. अश्या अत्यंत कठीण प्रसंगी व स्मृतिभ्रंशाची शिकार झालेल्या माझ्या आईच्या संगोपनाची सर्व जबाबदारी तपस ने खूप चांगली पार पाडली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच !

आज माझी आई खूप खुश व आनंदी आहे. दर दोन दिवसाआड मी तिच्याशी फोनवर बोलतो व ४-५ महिन्याने तिला भेटायला येतो. या स्मृतिभ्रंशात सुद्धा ती मला एक गोष्ट आवर्जून सांगते. ” अरे पुष्कर, इथे मला कसलीच चिंता नाही. माझ्या खाण्यापिण्याची व औषधपाण्याची हे सर्वजण खूप काळजी घेतात”. आज सातासमुद्रापार पुण्यातील तपस नावाच्या माझ्या दुसऱ्या घरात माझ्या आईला सुरक्षित व आनंदी ठेवण्यासाठी प्राजक्ता ताई व त्यांच्या सहकाऱ्यांचे शतशः आभार !

आज मी सुद्धा साठीच्या उंबरठव्याजवळ आलो आहे व आता सकारात्मक विचार करून भविष्यात हातपाय चालत असतानाच वृद्धांच्या काळजी गृहात जाण्याची मानसिक तयारी करणे हा एक व्यावहारिक विचार आहे व ती काळाची गरज आहे असे माझे ठाम मत झाले आहे

माझ्या आईच्या दुसऱ्या घरात तिला आनंदी ठेवणाऱ्या तपस ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! आणि हो, या आजी आजोबांचे मिळणारे आशीर्वाद हीच त्यांच्या यशाची पावती आहे

 

पुष्कर नाईक

Leave a Reply