तपस : आई-बाबांचे दुसरे घर!
माझ्या घरातले वातावरण अभ्यासू आणि वैचारिक होते. बाबा वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख होते, तर आई गृहिणी, गरजू मुलांना शिकवणारी. आम्ही दोघी बहिणी. निर्णय घेताना तो विचार , चर्चा करून, घेण्याची सवय अंगवळणी पडली होती . त्यामुळे मानसिक क्लेश न होता तसेच, योग्य निर्णय घेतले जातात आणि उपायांचा पाया मात्र भक्कम असतो, याची खात्री होती.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत आईचा स्मृतिभ्रंश खूप वाढला, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आखेगांवकर म्हणाले की, “यांना आता औषधांपेक्षा वातावरणबदलाची जास्त गरज आहे.” घरी एरवी मदतीला येणाऱ्या सर्व जणी आणि फिजिओथेरपिस्टही लॉकडाउनमुळे येऊ शकत नव्हते. खरेतर, २०१८मध्ये आईला पार्किन्सनचे निदान झाले, तेव्हा या सगळ्यांनी तिला खूप आधार दिला होता. ते तिचे कुटुंबच झाले होते. परंतु कोरोनामुळे तिच्यासाठी मदतनीस ठेवणे शक्य नव्हते. तिला डॉक्टरकडे नेता येत नव्हते आणि तेही तिला तपासायला घरी येऊ शकत नव्हते. अशा स्थितीत फोनवरूनच त्यांचे उपचार सुरू होते. आम्ही तिची काळजी घेत होतो, पण आईची तब्येत रोज बिघडत होती. ती आम्हाला ओळखत नव्हती. आयुष्याच्या कुठल्यातरी काळात तिची स्मृती अडकली होती. त्यामुळे ती तिथेच रमायची.
मी आणि समता, माझी अमेरिकेतली धाकटी बहीण या परिस्थितीसाठी पर्याय शोधू लागलो. कोरोनामुळे आई-बाबांना ठाण्याच्या माझ्या घरी नेणे शक्य नव्हते. वास्तविक, कोरोनामध्ये अशी कुठलीच जागा आईसारख्या रुग्णाकरता सुरक्षित वाटत नव्हती आणि आम्हाला आगीतून फोफाट्यात पडायचे नव्हते.पण, समस्या जन्माला येण्याआधी त्यांच्यावरचा इलाज जन्माला आलेला असतो. ते देवदूत आपल्या मदतीसाठी तयार असतात, ही जाणीव हा लेख लिहिताना झाली.
माझे मार्गदर्शक डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. शुभा थत्ते यांच्याशी मी या समस्येबाबत बोलले. त्या दोघांनीही मला ‘तपस’च्या प्राजक्ता वढावकर मॅडम यांचे नाव सुचवले. १५ वर्षांपूर्वी माझ्या लेकीला ज्या वेळी पाळणाघरात ठेवण्याची वेळ आली, त्या वेळी जे प्रश्न जाणवले, तसेच प्रश्न मला आई-बाबांच्या बाबतीत जाणवले. आमच्यासाठी हा पालकत्वासारखाच अनुभव होता.
अशा परिस्थितीत, माझी बहीण, मावशी आणि मी, आम्ही तिघींनी हा प्रकल्प समजून त्याचे नियोजन केले. ‘तपस’ला भेट दिली. त्या वेळी प्राजक्ताताईंनी मनातल्या सगळ्या शंकांचे समाधान केले. डॉक्टर आखेगांवकर यांनी बाबांना वेद्यकीयदृष्ट्या सगळी जाणीव करून दिली. सुरुवातीला बाबा तयार नव्हते. त्यांच्या वयाचा विचार करता हे साहजिक होते. अचानक घर सोडून कधी न पाहिलेल्या जागी राहायला जायचे हे त्यांच्यासाठी अवघड असले, तरी त्यांनी खूप हट्ट न करता हा पर्याय स्वीकारला. पैशांचे हिशोब केले. घरी सगळे सांभाळण्याचे आणि ‘तपस’मध्ये ठेवण्याचे फायदे-तोटे यांचा एक तक्ताच बनवला. अशा रीतीने, आठ दिवसांत आईबाबांना ‘तपस’मध्ये नेण्याचा निर्णय झाला.
त्यासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून आई-बाबांना ‘तपस’मध्ये सोडले. त्या वेळी मनामध्ये अपराधी वाटत होतेच. हा निर्णय कितपत यशस्वी होईल किंवा नाही याचीपण भीती मनात होती. तरीही हा निर्णय घेतला. माझे एक मन दुसऱ्या मनाला समजावत होते. यामध्ये आईचा आणि तिच्या स्वास्थ्याचा विचार होता. तिला चार महिने घरी सांभाळूनही यश आले नाही. तिचा आजार तर आटोक्यात येणे महत्त्वाचे होते. त्यात तिला कोरोना न होऊ देण्याचीही खबरदारी घेणे तर आवश्यक होते. कारण ती कॅन्सर-रुग्ण होती. या सगळ्या दृष्टींनी, मनातल्या इतर विचारांना आता महत्त्व न देण्याचे ठरवले.
आई-बाबांना ‘तपस’मध्ये सोडल्यावर, ‘आपण पूर्ण विश्साने त्यांना तिथे ठेवले आहे’, हा विचार मनात पक्का केला. त्यांची देखभाल करायला तिथे डॅाक्टर्स, नर्सेस, तरुण प्रशिक्षित वर्ग अशी मोठी फळीच होती. कोरोनामुळे आम्हाला भेटण्याची परवानगी नव्हती. कोरोना असूनही तिथले सगळे आजी-आजोबा मास्कशिवाय होते, ही मोठी सुखावह बाब होती. ज्येष्ठ मंडळींची देखभाल ते कुशलतेने करत होते.
आठवड्याभराने, डॉ. पाटील यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा आईची अर्धी औषधे कमी झाल्याचे समजले. ही खूप समाधान देणारी गोष्ट होती. तिथले व्यवस्थापक विजय सर, प्राजक्ताताई यांच्याशी नियमित बोलणे व्हायचे. कार्यक्रमांचे फोटोही यायचे. लॉकडाउन उघडल्यावर आम्ही जेव्हा आईबांबाना भेटलो, तेव्हा आईने आम्हाला ओळखले. थोडक्यात, वातावरणबदलाचा परिणाम झाला होता. घरापासून दूर असे हे घर.. पण तिथे फक्त वैद्यकीय देखभाल होत नाही; तर मनेही जपली जातात. आजी-आजोबांबरोबर त्यांच्या नातेवाइकांचीही मने ‘तपस’ टीम उत्तम सांभाळते. जगण्यातला सगळा रस निघून गेलेल्यांमध्ये ते चैतन्य पुन्हा आणण्यासाठी सगळे सण, वाढदिवस, खेळ, उपक्रम अत्यंत उत्साहात केले जातात. हरतालिकेला आज्यांच्या नखांना नेलपेंट लावतात, मेहंदी काढतात. संक्रांतीला आजोबा पतंग उडवतात. आपण घरी करणार नाही, इतक्या दणक्यात वाढदिवस साजरा करतात. उपक्रमांचे एक वेळापत्रक तिथे बनवलेले असते. याही वयात सगळे अनुभव त्यांना दिले जातात. ख्रिसमसला केक-सजावट, दिवाळीला लाडू वळणे, आकाशकंदील तयार करणे, होळीला रंगांचे पंजे भिंतीवर उमटवणे, कोजगिरीला चुलीवर दूध आटवणे, सण व विशेष दिवसाची माहिती सांगणे, मोठ्या पडद्यावर चित्रपट बघणे इत्यादींचा त्यांत समावेश असतो. दिवाळीत बाबांनी फुलबाजा पेटवला, उन्हाळ्यात बर्फाचा गोळा तयार करून खाल्ला. हे सर्व त्यांनी यापूर्वी कधी केलेले त्यांना आठवत नव्हते. किंबहुना पुन्हा करायला मिळेल, असेही वाटले नव्हते.
आई अकरा महिने ‘तपस’मध्ये होती. ‘तपस’मुळे तिला ते अकरा महिने आयुष्य ‘जगायला’ मिळाले. तिच्या निधनानंतर बाबा खूप पटकन सावरले. अर्थात समवयस्क, डॉक्टर्स आणि काउन्सेलर त्यांच्यासोबत होते. जेव्हा ‘तपस’मधले एखादे आजी किंवा आजोबा पुढच्या प्रवासाला लागतात, तेव्हा त्यांच्यासोबत नेहमी असणाऱ्या ताई-दादांसाठी प्राजक्ता मॅडम शोकसभा घेतात. आपले माणूस गेल्यानंतर वाटणारे आपलेच दुःख मोठे. पण ही मंडळी चोवीस तास त्यांच्यासोबत असतात.
आईच्या जाण्यानंतर बाबांना ‘तपस’च्या औंधच्या ओल्ड-एज केअरवर हलवायचे होते. पण त्यांना इथला स्टाफ, वातावरण सुरक्षित वाटले. त्यांना ते इतके आवडले की, नंतर बाबा तिथेच राहिले. पण कुणीही त्यांना जबरदस्ती केली नाही. त्यांनी ‘हो’ म्हटल्यावर प्राजक्ताताई स्वतःच त्यांना औंधला घेऊन गेल्या.
‘तपस’च्या भेटी कधीच भकास वाटल्या नाहीत. आजूबाजूला भरपूर झाडी, आजी-आजोबांनी केलेली सजावट, सणांसाठी केलेली तयारी, असा सृजनात्मक-रंगीबेरंगी, स्वागतकक्ष. एक-दीडच्या सुमारास गेलात, तर तुम्हाला जेवायचा आग्रह होतो, चार वाजता चहा-फराळ नक्की देतात. सगळ्या आजी-आजोबांचे जेवण झाल्यावरच ताई-दादा जेवण करतात. माझ्या बाबांना कमी ऐकू येते. आमचा फोन गेला, की त्यांना मदतनीस हेडफोन्स लावून द्यायचे. घरी मोबाईल न वापरणाऱ्या बाबांना ‘तपस’मधल्या ताई दादांनी मोबाईल वापरायला शिकवला.
एक लक्षात राहिलेला प्रसंग नमूद करावासा वाटतो. एकदा बाबांचे पोट बिघडले होते. त्यामुळे अशक्तपणा होता. चौकशी केल्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल कळले आणि काळजी वाटली, की ‘आता ते काय जेवतील?’ तोच मॅडम म्हणाल्या, “त्यांना आम्ही मऊ खिचडी किंवा मेतकूट-भात देऊ. त्यांना जे आवडेल ते. नंतर बरे झाल्यावर अशक्तपणा जायला शिरा.”
बाबांचे अमेरिकेला जायचे ठरल्यावर त्यांच्याइतकेच ताई-दादापण उत्साही होते. पासपोर्ट ऑफिसला जाताना व्यवस्थित तयारी करून दिली. नाश्ता तयार ठेवलाच, शिवाय सोबत बिस्किटे व पाण्याची बाटली दिली. ज्या दिवशी बाबा अमेरिकेला जाणार होते, तेव्हाही बाबांचे प्रिस्क्रिप्शन, औषध, बॅग सगळी तयारी करून ठेवली होती.
बाबांचे वक्तृत्व आणि लेखन उत्कृष्ट होते. मात्र मधल्या काळात या सगळ्या गोष्टी मागे पडल्या होत्या . वाचनही कमी झाले होते . पण ‘तपस’मध्ये या सगळ्या छंदांना पुन्हा अंकुर फुटले. तपसमधल्या लायब्ररीत खूप छान पुस्तकसंग्रह आहे. तिथल्या कार्यक्रमामध्ये बाबा स्वत: नोट्स काढून भाषण करू लागले.
बाबांना भेटायला जाताना ‘बाबा, खायला काय आणू?’ विचारल्यावर, ‘काही नको. इथे आम्हाला सगळं मिळतं.’ हे त्यांचे समाधानकारक उत्तर ठरलेले असायचे.
या आमच्या अनुभवातून मला ‘तपस’सारख्या संस्था आधुनिक वानप्रस्थाश्रम वाटतात. आयुष्य अशा टप्प्यावर जेव्हा येते की, आयुष्यमान वाढल्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संसाराचे गाडे ओढणे कठीण वाटते, पिढ्यातले अंतर वाढतच असते. नातेवाइकांपेक्षा डॉक्टर आणि दवाखाना जवळचा वाटतो. झपाट्याने होणारे बदल स्वीकारणे अवघड होते. एकटे राहू शकत नाही. मग समवयस्क, समविचारी, समदुःखी एकत्र आल्याने आणि संसाराचा कुठला बोजा नाही यामुळे जगणे सुखावह होते. मोठ्या संसाराचा हा एक बोन्सायच नाही का?
असे हे घरापासून दूर असले, तरी आई बाबांचे दुसरं घरच.
**
ममता महाजन
९७६९५५३२५५